Sharad Pawar : शरद पवार यांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित; पोलिसांचा अंतर्गत वादामुळे...?
पोलीस खात्यातील अंतर्गत वादामुळेच शरद पवारांच्या घरावरील हल्ला रोखण्यात अपयश आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिलीय.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या घरावर हल्ला होणार असल्याची माहिती पोलिसांच्या गुप्तचर खात्यानं पोलीस सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांना दिली होती. एसटी कर्मचारी ४ एप्रिलला सिल्वर ओक ( Silver Oak ) येथे आंदोलन करणार आहेत असा अलर्ट गुप्तचर खात्यानं दिला होता.
गुप्तचर खात्यानं दिलेल्या या अलर्टकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं त्यामुळेच हा हल्ला झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. पोलीस खात्यातल्या अंतर्गत वादामुळेच शरद पवार यांच्या घरावरील हल्ला रोखण्यात अपयश आल्याचंही या सूत्रांनी म्हटलं.
४ एप्रिलला शरद पवार यांचा सिव्हर ओक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhhav Thackerey ) यांचा वर्षा बंगला ( Varsha Bunglow ) आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्याजवळ एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत, असं अलर्ट करणारं पत्र गुप्तचर खात्यानं सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांना दिलं होतं. तरीही पोलीस गाफील राहिल्याचं समोर आलंय. पोलीस विभागातल्या अंतर्गत वादामुळेच हा हल्ला रोखण्यात अपयश आल्याची चर्चा आता यामुळे सुरू झालीय.
दरम्यान, ही माहिती समोर आल्यामुळे शरद पवार यांच्या घरावर झालेला हलला हा पूर्वनियोजित असल्याचं स्पष्ट झालंय.