मुंबई: शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर शुक्रवारी रात्री काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात हा प्रकार घडला. मात्र, काते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. परंतु, या हल्ल्यात त्यांचा अंगरक्षक आणि दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो-३ प्रकल्पातील कारशेडचे काम सुरु आहे. दिवसरात्र सुरु असणाऱ्या या कामामुळे स्थानिक रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात काते यांच्या नेतृत्त्वाखाली नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा कारशेडचे काम थांबवण्यात आले होते. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा या कामाला सुरुवात झाली. 


तुकाराम काते यांनी काल रात्री आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन हे काम पुन्हा थांबवले. तेथून परतत असताना काते यांच्यावर हल्ला झाला. मात्र, अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांच्या सावधानतेमुळे काते थोडक्यात बचावले. मेट्रोच्या कंत्राटदारानेच हल्ला घडवून आणल्याचा आरोप काते यांनी केला आहे.