रिक्षाचालकामुळे `त्या` अल्पवयीन मुली सुखरूप घरी पोहोचल्या
रिक्षाचालकाचं होतंय कौतुक
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : बॉलिवुडच्या वेड्या आकर्षणातून दोघी अल्पवयीन मुली बंगळुरुहून मुंबईत पळून आल्या. मात्र एका देवदुतामुळे त्यांची पुढची फरफट थांबली आणि त्या पुन्हा सुखरुप घरी पोहोचल्या. काय घडला नेमका प्रकार?
बॉलिवूडमध्ये नशिब अजमवण्याकरता घरच्यांना न सांगता बंगळुरुहून दोघी १५ वर्षांच्या मुली पळून मायानगरी मुंबईत आल्या. लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरून त्यांनी रिक्षाचालक जितेंद्र यादव उर्फ सोनू यांच्या प्रिपेड रिक्षातून, अंधेरीतलं एक प्रसिद्ध मीडिया हाऊस गाठलं. दरम्यान रिक्षाचालक जितेंद्र यादव यांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी उचललेलं गंभीर पाऊल आणि त्यातला धोका यादव यांच्या लक्षात आला. आणि यादव यांनी मुलींना समजावून त्यांना बंगळुरुला जाणाऱ्या गाडीमध्ये बसवून त्यांच्या घरी रवाना केलं.
एकिकडे मुजोर वागणुकीमुळे रिक्षाचालक बदनाम असताना, जितेंद्र यादव यांनी आपल्या कृतीने नवा आदर्श घालून दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत रिक्षा युनियन आणि लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस व्यवस्थापकांनी त्यांचा सत्कार केला. जितेंद्र यादव यांच्यामुळे बंगळुरुतल्या दोघी अल्पवयीन मुली पुन्हा सुरक्षित आपल्या घरी पोहोचल्या. त्यामुळे अल्लड वयातल्या मुलामुलींनी घरातून पळून येण्यातला धोका ओळखण्याची गरज आहे.