सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-10 गाड्यांच्या यादीत अवघ्या 45 दिवसात सॅंट्रोचा समावेश
ह्युंदाई मोटरच्या नव्या सॅंट्रो कारने आपल्या नव्या लूकसोबत ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा रेकॉर्ड केला आहे.
मुंबई : ह्युंदाई मोटरच्या नव्या सॅंट्रो कारने आपल्या नव्या लूकसोबत ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा रेकॉर्ड केला आहे. सॅंट्रो कार लॉन्च झाल्यानंतरच्या दीड महिन्यातच सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या, टॉप-10 गाड्यांच्या यादीत सँट्रोने स्थान मिळवलं आहे. ह्युंदाईने सँट्रो गाडीला मार्केटमध्ये लाँच केल्यापासून ९ हजार ९ गाड्यांची विक्री झाली आहे. यासोबतच टॉप-10 च्या यादीत दहावं स्थान पटकावलं आहे. ALL NEW SANTRO गाडी 23 ऑक्टोबरला लॉन्च झाली. या गाडीबद्दल ग्राहकवर्गात इतकी उत्सुकता होती की, लाँच होण्याआधीच 23 हजार 500 गाड्यांची आगाऊ बुकिंग करण्यात आली होती.
नव्या सेंट्रोची झलक
नवी सँट्रोच 1.1 लीटरचं पेट्रोल इंजिन आहे. गाडीत पहिल्यांदा पाठीमागे एसी वेंट देण्यात आला आहे. गाडीचं इंजीन 68 ब्रेक हॉर्सपॉवर इतकं आहे. 99 न्यूटन मीटर इतकं टॉर्क निर्माण करतं. 5 स्पीड मॅन्यूअल आणि 5 स्पीड एएमटी गियर बॉक्स देण्यात आलं आहे. यासोबतच कंपनीने 3 वर्षांच्या रोड असिस्टेंट आणि 3 वर्षांची वॉरंटी दिली आहे. या गाडीची शोरुमला किंमत 3 लाख 89 हजारापासून 5 लाख 64 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
टिओगोला पछाडलं
नव्या सॅंट्रो गाडीने टाटाच्या टिओगो मॉडेलला मागे टाकलं आहे. तसेच मारुतीच्या सेलेरियो गाडीला सुद्धा सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-10 गाड्यांच्या यादीत स्थान मिळवता आलं नाही. सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-10 गाड्यांच्या यादीत मारुती सुझुकी वॅगनआरचाच दबदबा आहे. 2018-नोव्हेंबर मध्ये सुझुकी वॅगनआरच्या 11 हजार 311 गाड्यांची विक्री झाली आहे. मनीभास्करनुसार, नोव्हेंबर 2018 ला Tiagoच्या 7 हजार 870 गाड्यांची विक्री झाली.