Mumbai Auto Driver News: रिक्षावाले आणि त्यांनी ग्राहकांना भाड्यासाठी दिलेला नकार हा मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीबरोबर पुण्यासारख्या शहरांमध्ये सातत्याने चर्चीला जाणारा विषय आहे. अनेकदा रिक्षावाले हा मुद्दा निघाला की लोक फार तावातावाने बोलताना दिसतात. रिक्षावाल्यासंदर्भातील संताप या मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांच्या बोलण्यातूनच जाणवतो. अनेकदा पोलिस कारवाई आणि इशारे आणि नोटीसा देऊनही हा नकार काही ग्राहकांचा पिच्छा सोडत नाही. याच नकारामुळे आणि अनेकदा रिक्षावाल्यांच्या आरेरावीमुळे त्यांची एक नकारात्मक प्रतिमा लोकांच्या मनात तयार झाली आहे. मात्र सगळे सारखे नसतात या उक्तीनुसार काही रिक्षावाले त्यांच्या वागण्यातून लोकांची मनं जिंकतात. असाच प्रकार सध्या मुंबईमध्ये घडला. एका रिक्षाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 


हजारोंच्या संख्येनं लाईक्स अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमधील व्हायरल झालेल्या या रिक्षाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे नंदिनी अय्यर नावाच्या महिलेने. या फोटोला हजारोंच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत. 200 हून अधिक वेळा हा फोटो शेअर करण्यात आला असून फोटोला 2 हजार 300 हून अधिक लाईक्स आहेत. या फोटोवर अनेकांनी कमेंट करुन हे असं चित्र मुंबईतच पहायला मिळू शकतं असं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील अनेकांचं लक्ष या फोटोने वेधून घेतलं आहे. 


फोटोमध्ये नेमकं काय आहे?


"वागणूकही महत्त्वाची असते" अशा मथळ्यासहीत नंदिनी यांनी हा फोटो शेअऱ केला आहे. "मुंबईतील रिक्षावाला मोफत पाणी देतोय. हे फार समाधानकारक चित्र आहे, चांगलुपणा वाटला पाहिजे," असं नंदिनी यांनी फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे. नंदिनी यांनी शेअर केलेला फोटो रिक्षात क्लिक केलेला आहे. रिक्षाच्या मागच्या सीटवरुन काढलेल्या या फोटोमध्ये रिक्षाचालक पाठ टेकवतो त्या उशीसारख्या भागाच्या मागील बाजूस पिण्याच्या पाण्यासाठीचा एक छोटा स्टॅण्ड लावण्यात आला आहे. या स्टॅण्डवर छोट्या आकाराच्या पाण्याच्या बाटल्या आहेत. या स्टॅण्डवर 'फ्री पिण्याचे पाणी' असं लिहिलेलं आहे. तसेच रिक्षातून प्रवास करणाऱ्यांसाठी पेपर आणि बिस्कीटही ठेवण्यात आली आहेत. मात्र ही बिस्कीट मोफत आहेत की पेड हे नमूद करण्यात आलेलं नाही.



अशी लोक आहेत म्हणून...


अनेकांनी या रिक्षावाल्याचं नाव आणि क्रमांक नंदिनी यांना विचारला आहे. मात्र आपण त्याची माहिती घेतली नाही असं नंदिनी यांनी रिप्लाय करुन सांगितलं आहे. पण आपण या रिक्षामधून मुंबईतील चेंबूर परिसरामध्ये प्रवास केला होता हे नंदिनी यांनी सांगितलं आहे. अनेकांनी या रिक्षावाल्याचं कौतुक केलं असून अशी भली माणसं आहेत म्हणून आजही माणुसकीवरील विश्वास टिकून आहे अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.