मुंबई : अवनी वाघिणीच्या शिकारीवरून केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून प्रत्युत्तर दिलंय. गांधी यांचा या विषयी कमी माहिती आहे. त्यामुळे त्या टीका करत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तसंच आक्षेप असेल तर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी असं मुनगंटीवार म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी वन वाघिणीला ज्या पद्धतीने मारण्यात आलं, त्यावर मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवरांसह वनखात्यावर टीका केलीय. सुधीर मुनगंटीवारांनी, असे आदेश दिलेच कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.


दरम्यान, अवनी वाघिणीच्या मृत्यूच्या वेळी काय परिस्थिती हे तपासून बघितलं पाहिजे असं विधान  आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. त्यातून कोणालाही आनंद होण्याचे काहीही कारण नाही, घटनेचे दुःखच आहे. आता तिच्या मृत्यूबद्दल काही आक्षेप घेतले जात आहेत. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. पण त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल. 


केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्या सुरुवातीपासूनच प्राणीप्रेमी आहेत.  अनेकदा त्या मला यासंदर्भात फोन करत असतात. प्राण्यांबाबतचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्या माझ्याकडे पाठपुरावा करत असतात.  त्यांनी तीव्र शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केलेले आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.