Why Blackbuck Is So Important For Bishnoi Community: 'सलमान खानला जो मदत करणार त्यांना आम्ही संपवणार' असं आपलं धोरण असल्याचं बिष्णोई टोळीने अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर म्हटलं आहे. खरं तर सध्याच्या घडीलाच नाही तर मागील अनेक वर्षांपासून आघाडीचा अभिनेता असलेल्या सलमान खानविरुद्ध बिष्णोई टोळीचा संघर्ष मागील अनेक वर्षांपासूनचा आहे. मात्र 2022 मध्ये न्यायालयाने सलमानला काळवीट शिकार प्रकरणात निर्दोष मुक्त केल्यानंतर हा संघर्ष अधिक चिघळला असून सलमान आपल्या हीट लिस्टवर असल्याचं बिष्णोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोईचं म्हणणं आहे. असं असतानाच अगदी एका नामवंत नेत्याची हत्या केल्यानंतर सलमानच्या जीवावर उठलेल्या बिष्णोई टोळीसाठी काळवीट एवढं महत्त्वाचं का आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचे उत्तर आहे 1998 पासून 2022 दरम्यान घडलेल्या घटनांमध्ये आणि काळवटीबद्दल बिष्णोई समाजाला असलेल्या ममत्वामध्ये. हा बिष्णोई समाज काळवीटाला एवढं का मानतो? संपूर्ण देशभरात चर्चा असलेल्या या प्रकरणात काळवीट कनेक्शन काय आहे जाणून घेऊयात...


हे काळवीट शिकार प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘हम साथ साथ है’ या चित्रपटाचे चित्रीकरण 1998 साली सप्टेंबर महिन्यामध्ये जोधपूर येथे सुरु होतं. त्यावेळी सूरज बडजात्या यांच्या या चित्रपटात सहकारी असलेले सहाय्यक कलाकारांबरोबर सलमान शिकारीसाठी गेला होता. त्यावेळेस सलमानबरोबर अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खानही होता. त्यावेळी राजस्थानमध्ये संरक्षित म्हणून घोषित करण्यात आलेल्या काळवीटाची शिकार सलमानने केली होती. तसा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला. 1 व 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री सलमानने दोन काळवीटं मारल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी सलमानसोबत असलेल्या कलाकारांनी त्याला शिकारीसाठी प्रोत्साहन दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. बिष्णोई समाजाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर 2 ऑक्टोबर 1998 रोजी पहिल्यांदा काळवीट शिकार प्रकरणी सलमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी सलमानला या प्रकरणी पहिल्यांदा अटक झाली. सलमाननेच गोळी चालवल्याचा ठपका ठेवत न्यायालायने त्याला दोषी ठरवत इतर कलकारांना न्यायालयाने दोषमुक्त केलं. अटकेनंतर पाच दिवसांनी म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी सलमान जोधपूर तुरुंगामधून जामीनावर बाहेर आला.


काळवीटांची शिकार झाली त्या रात्री नेमकं घडलं काय?


त्या रात्री प्राथमिक तक्रारीत नोंद असलेले सलमानसहीत सर्व आरोपी एका जिप्सीमधून प्रवास करुन शिकारीसाठी गेले. सलमान ही जिप्सी चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने जिप्सी थांबवत गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये 2 काळवीटं मारली गेली असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयातील युक्तीवादादरम्यान केला. मात्र सलमाननेच गोळीबार केल्याचा पुरावा सरकारी पक्षाकडे नसून सलमान आरोपी असल्याचं सिद्ध करता येत नसल्याचंही सलमानच्या वकिलांनी पहिल्यांदा युक्तीवाद करता सांगितलं. खरं तर या प्रकरणामध्ये दरवर्षी सुनावणीदरम्यान नवे दावे केले गेले अखेर या प्रकरणात सलमान 2022 साली दोषमुक्त करण्यात आलं.


कोर्टाने सोडलं पण बिष्णोई गँग सोडेना...


कोर्टात हे काळवीट शिकार प्रकरण 1998 ते 2022 असं तब्बल 24 वर्ष चाललं. मात्र या प्रकरणात न्यायालयाने सलमानला निर्दोष सोडलं असलं तरी बिष्णोई टोळीनं सलमानला संपवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं म्हटलं आहे. सलमानने माफी मागावी नाहीतर आम्ही त्याला संपवणार असं बिष्णोई टोळीचं म्हणणं आहे. बिष्णोई टोळीनं यापूर्वी सलमानला अनेकदा धमका दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या घरावर बिष्णोई टोळीतील काही जणांनी गोळीबारही केला होता. त्याच प्रकरणातील एका आरोपीच्या मृत्यूचा बदला म्हणून आता सलमानच्या अगदी जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आल्याचा दावा आरोपींपैकी एकाने पोस्टमधून केला आहे. मात्र या साऱ्या गोंधळामध्ये एक प्रश्न कायम राहतो तो म्हणजे बिष्णोई समाजासाठी काळवटी एवढं महत्त्वाचं का आहे की ज्यासाठी अगदी एका नेत्याची हत्या करुनही ही टोळी सलमानच्या मागे लागली आहे? हेच जाणून घेऊयात...


बिष्णोई समाजासाठी काळवीट एवढं महत्वाचं का?


बिष्णोई समाजाचा इतिहास शोधायला गेल्यास तो अगदी 15 व्या शतकापासून अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. सध्याच्या राजस्थानमधील जोधपूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अगदी मागील अनेक शतकांपासून हा समाज वास्तव्यास आहे. या समाजामधील लोक निसर्गालाच देव मानतात. त्यामुळे त्यांच्या धार्मिक मान्यतांनुसार झाडाची पानं, फुलांबरोबर अगदी प्राण्यांपर्यंत अनेक गोष्टींच्या संवर्धनासाठी ते प्रयत्न करतात. त्यातही काळवीटाला या समाजामध्ये फारच जास्त धार्मिक महत्त्व आहे.


बिष्णोई समाजामध्ये काळवीटाला महत्त्व असण्याचं मुख्य कारण म्हणजे काळवीट हे त्यांच्या समाजातील सर्वात प्रमुख गुरु असलेल्या भगवान जांम्बेश्वर किंवा जंम्बाजी यांचं रुप असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच हा समाज काळवीटांना त्रास देणं किंवा त्यांची हत्या करणं हा या जगातील सर्वात मोठा गुन्हा असल्याचं मानतात. याच समाजाने सलमानविरोधात पहिल्यांदा काळवीट शिकार प्रकरणात तक्रार दाखल केलेली.


यावरुनच समाजाला नाव आणि ओळख मिळाली


गुरु भगवान जांम्बेश्वर किंवा जंम्बाजी हे या समाजाचे आद्यगुरु मानले जातात. काहींच्या मते बिष्णोई हा शब्द राजस्थानमधील स्थानिक भाषेनुसार बिश म्हणजेच वीस आणि नोई म्हणजेच नऊ यावरुन आल्याचं सांगतात. गुरु भगवान जांम्बेश्वरांनी सांगितलेल्या 29 नियमांचं पालन करणारा समाज म्हणून या समाजाचं नाव या आकड्यावरुन बिष्णोई असं पडल्याची एक मान्यता आहे. तर अन्य एका मान्यतेनुसार बिष्णोई हा शब्द विष्णू शब्दावरुन आल्याचं मानतात. समाजाला घालून देलेल्या 29 नियमांमध्ये प्राण्यांच्या संरक्षणाचाही मुद्दा आहे. त्यामुळेच  प्राण्यांच्या संवर्धानासाठी या समाजातील लोक अगदी स्वत:चा जीवही पणाला लावू शकतात.


सर्वच प्राणीपक्षांना त्यांचे हक्क; 1700 शिकारी पकडून दिलेत


बिष्णोई ही जगातल्या काही मोजक्या समाजांपैकी आहे जे प्राणी, पक्षी आणि वनस्पतींनाही मानवाप्रमाणे स्वत:चे हक्क असल्याचं मानतात. निसर्ग आणि माणसाने एकत्र राहिलं पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये बिष्णोई समाजाने स्वत: पुढाकार घेत 1700 शिकाऱ्यांना आणि त्यांच्या मदतनीसांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलिसांचाच एक 2016 चा अहवाल सांगतो.