मुंबई: ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर शेतकरी नेते बच्चू कडू यांनी लगेचच कामाला सुरुवात केली आहे. बच्चू कडू यांनी बुधवारी दर्यापूरमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची अक्षरशः झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी कामचुकारपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना इंगा दाखवला. लोकांची कामे वेळेत न करणाऱ्या दोन नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नायब तहसीलदार जयंत डोळे आणि दर्यापूरचे नायब तहसीलदार (पुरवठा) सपना भोवते अशी त्यांची नावे आहेत. यापैकी जयंत डोळे यांच्यावर संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. तर सपना भोवते यांनी नागरिकांना रेशनकार्ड देण्यात दिरंगाई केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले. 


यासंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, मी आज अचानक दर्यापूर तहसिलदार कार्यालयात जाऊन भेट दिली. त्यावेळी पवार नावाच्या पारधी समाजातील शेतकऱ्याने माझ्याकडे रेशनकार्ड मिळत नसल्याची तक्रा केली. गेल्या वर्षभरापासून ते अंत्योदय कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मी त्यांची फाईल पाहिली तेव्हा वर्षभरापासून कामकाज पुढेच सरकले नसल्याचे दिसून आले. 



सेवा हमी कायद्यानुसार सात दिवसांहून अधिक काळ कोणतीही फाईल प्रलंबित ठेवता येत नाही. असे झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी लागते. त्यामुळे आपण संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.