मेघा कुचिक, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : आंदोलक नेता अशी बच्चू कडू यांची ओळख. आंदोलन करुन प्रशासनाला घाम फोडणारे बच्चू कडू आता मंत्री झालेत. राज्यमंत्री बच्चू कडू आता प्रशासन कसं चालवतात, हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकर्त्यांमधून एकच भिडू बच्चू कडू अशी आरोळी आली की आमदार बच्चू कडू आले असं समजून जायचं. हाडाचे आंदोलक अशी प्रतिमा असलेले बच्चू कडू... बच्चू कडू म्हटलं तर पहिल्यांदा आठवतात त्यांची आंदोलनं. चिखलात बसून केलेलं आंदोलन असो किवा त्यांचं शोलेगिरी आंदोलन. शोलेगिरी आंदोलन हे बच्चू कडूंनीच महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्यांनी मंत्रालयात सरकारी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे राज्यात मोठा गजहब माजला होता.


अपंगांसाठीची त्यांची आंदोलनं लक्षवेधी असतात. बाबूगिरीविरोधातलं त्यांचं झोपा काढो आंदोलनही खास असंच असतं. रिक्षानं विधिमंडळात येणारा पहिला आमदार अशी त्यांची ओळख. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर ते अतिशय पोटतिडकीनं बोलतात. मंत्रिपद मिळाल्यानंतरही त्यांचे तेवर बदललेले नाहीत.


मंत्रिपद मिळाल्यानंतर बच्चूभाऊ म्हणून लोकप्रिय असलेल्या आपल्या नेत्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. सत्ता आल्यावर भलेभले बदलतात. बच्चू कडूंचा स्वभाव बदलतो? की सत्तेतल्या लोकांना बदलवतात ये येत्या काळात कळेल.