दीपाली जगताप पाटील, झी २४ तास, मुंबई : यंदा एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल कमालीचा घसरला. दहावीच्या निकालातली आणखी एक चिंतेची बाब म्हणजे दाहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा निकाल. लाभले आम्हास भाग्य... मराठीचं हे अभिमान गीत म्हणताना त्यातल्या आपुल्या घरात हाल सोसते मराठी याच ओळी दुर्दैवानं खऱ्या ठरत आहेत. कारण नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात मराठी विषयात नापास झालेल्या आणि कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा 11 लाख 93 हजार 591 विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची परीक्षा दिली. त्यापैकी तब्बल 2 लाख 57 हजार 627 विद्यार्थी नापास झालेत. तब्बल 21.58 टक्के विद्यार्थी मराठी भाषेत नापास झालेत. मुंबई विभागात मराठी विषयांत ही घट 14 टक्के इतकी आहे.


यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना कृतीपत्रिकेवर आधारीत स्वविचारावर उत्तर लिहीण्याची परीक्षा पद्धत होती तसेच तोंडी परीक्षा रद्द करत 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. याने निकाल घसरला असल्याचे स्पष्टीकरण दिलं जातं आहे. पण हे बदल योग्य पद्धतीने शिक्षकांकडून अंमलात आणले गेले का? त्याचबरोबर विज्ञान, गणित यासारख्या विषयाइंतकं लक्ष मराठी भाषेकडे पालक तरी देतात का?
 
अंतर्गत गुण योग्य प्रकारे दिले जात नसतील तर त्याची अप्रमाणिक अंमलबजावणी करणा-यांमध्ये बदल करण्याऐवजी अंतर्गत गुणच रद्द करण्यात आले. दहावीचा कमी लागलेला निकाल, त्यात मराठी भाषेत मोठ्या संख्येने नापास झालेले विद्यार्थी, यानंतर आता राज्य सरकारचे शिक्षण विभाग नेमके काय पावलं उचलतं हे पहाणं महत्वाचे आहे.