बाळासाहेबांचं स्मारक जनतेचं आहे, समितीत कोण याबाबत देणं-घेणं नाही - फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या (Balasaheb Thackeray memorial) कामाची पाहणी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, बाळासाहेबांचं ऐतिहासिक स्मारक होत आहे. पहिल्या टप्प्यातील 50 टक्के काम झालं आहे. मार्च 2023 आधी पूर्ण होईल. दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे. यामध्ये ऑडिओ व्हिडिओ बाळासाहेबांची भाषणं, व्यंगचित्र यांचा जीवन संग्रह असेल. बाळासाहेबांचा राजकीय प्रवास दुसऱ्या टप्प्यात सुरु होईल.
'हे स्मारक प्रेरणादायी ठरेल. युद्धपातळीवर काम सुरु आहे. हे स्मारक लवकर पूर्ण व्हावे. ही आमची इच्छा आहे. हजारो लाखो लोकं येथे येतील. देशाला, राज्याला दिशा देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. हिंदुत्वाचे विचार पुढे नेले. त्यामुळे हे स्मारक लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.' असं ही मुख्यमंत्री म्हणाले.
स्मारकाचा वापर वैयक्तिक बैठकीसाठी नको- फडणवीस
'भाजप पक्षाची कुठलीही मागणी नाही. ही वैयक्तिक मागणी असू शकते. हे जनतेचं स्मारक आहे. समितीत कोण आहे याबाबत आम्हाला देणं-घेणं नाही. स्मारकाचं काम लवकर झालं पाहिजे. ही आमची इच्छा आहे. मी मुख्यमंत्री असताना आम्ही जागा आणि निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. ते आता मुख्यमंत्री असताना काम पूर्ण होईल. जनतेला यातून प्रेरणा मिळावी म्हणून हे स्मारक बनावे. प्रायव्हेट मिटिंगसाठी याचा वापर होऊ नये. नियमांचं पालन व्हावं असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.