बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा देण्याचा निर्णय रद्द करा, हायकोर्टात याचिका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा निवडण्याचा निर्णय चुकीचा असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा निवडण्याचा निर्णय चुकीचा असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
जनमुक्ती मोर्चा या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष मानव जोशी यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्याच्या मुख्य सचिवांसह मुंबई महापालिका आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्याची आर्थिक बिकट अवस्था पाहता एक रुपया भाडेपट्टयाने ३० वर्षांसाठी जागा देणं चुकीचं असून स्मारकाचा खर्च सरकारी तिजोरीवर आर्थिक बोजा आहे असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे.
याशिवाय महापौर बंगल्याची जागा आरक्षित असल्याने त्याचा वाद सुरू आहे, असं असताना विकास आराखड्यात होणारा बदल हा अधिकाराचा गैरवापर करण्याचा प्रकार आहे असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. महापौर बंगल्याची जागा सीआरझेडमध्ये येत असून हेरिटेज प्रकारातही येते त्यामुळे या ठिकाणी स्मारक नको असंही याचिकेत म्हणण्यात आलं आहे.