मुंबई: महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरचे पालकमंत्रीपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे पद पक्षातील नाराज नेत्यांसाठी सोडण्यात आले आहे. काँग्रेसच्या वाट्याला १० पालकमंत्री पदे आली आहेत. त्यामुळे पक्षातील इतर मंत्र्यांना संधी मिळावी यासाठी बाळासाहेब थोरात यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खातेवाटपात काँग्रेसला मनासारखी खाती मिळालेली नाहीत. त्यामुळे अनेक मंत्री नाराज आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी दूर करण्यासाठी स्वत: बाळासाहेब थोरातांनीच आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. 


तब्बल आठवडाभर रखडलेल्या ठाकरे सरकारच्या खातेवाटपाला रविवारी अखेर मुहूर्त मिळाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खातेवाटपाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांसोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ३० डिसेंबर रोजी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र काही खात्यांबाबत काँग्रेसने आग्रह धरल्याने खातेवाटपाचा तिढा कायम राहिला होता. त्यामुळे सहा दिवस उलटले तरी खातेवाटप जाहीर करण्यात आलं नव्हतं. मात्र, खातेवाटप लांबत चालल्याने काँग्रेसनेच एका पाऊल मागे घेतल्याने खातेवाटपाचा तिढा सुटला.