वांद्रे ते विरार उन्नत प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळ गुंडाळण्याच्या विचारात
पश्मिच रेल्वेच्या उन्नत प्रकल्पावर अस्तित्वाची टांगती तलवार लटकत आहे. वांद्रे ते विरार असा हा उन्नत प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव ..
मुंबई : पश्मिच रेल्वेच्या उन्नत प्रकल्पावर अस्तित्वाची टांगती तलवार लटकत आहे. वांद्रे ते विरार असा हा उन्नत प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र मुंबई रेल्वे विकास महामंडळ आता हा प्रकल्पच गुंडाळण्याच्या विचारात आहे.
रेल्वेमंत्र्यांची महामंडळाला सूचना
उन्नत प्रकल्पासाठी लागणारी जमीन हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यासाठी वापरु द्यावी अशी मागणी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. यावर मुंबईसाठी प्राधान्यानं कोणत्या प्रकल्पांची गरज आहे हे पाहून, सर्वसमावेशक अहवाल तयार करण्याच्या सूचना रेल्वेमंत्र्यांनी महामंडळाला दिल्या.
उन्नत प्रकल्प फारच खार्चिक?
दरम्यान, वांद्रे ते विरार मार्गावर मेट्रो रेल्वेही होणार आहे. त्यामुळे उन्नत प्रकल्प किती व्यवहार्य ठरेल अशी विचारणा होत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा उन्नत प्रकल्प फारच खार्चिक असणार आहे. परिणामी हा प्रकल्प गुंडाळण्याचा विचार मुंबई रेल्वे विकास महामंडळ करत आहे. तसा प्रस्तावही महामंडळानं रेल्वेमंत्र्यांपुढे ठेवला आहे.
मेट्रोच्या चार डब्यांत गर्दी कशी मावणार?
दरम्यान आधी प्रकल्पाची घोषणा करायची नंतर तो रद्द करायचा हा प्रवशांच्या भावनांशी खेळ असल्याचा आरोप प्रवासी संघटनेनं केलाय. सोबतच उन्नत प्रकल्पाला पर्याय ठरणाऱ्या मेट्रोच्या चार डब्यांत रेल्वेची ११ डब्यांची गर्दी कशी मावणार, असा सवालही प्रवासी संघटनेनं उपस्थित केला आहे.