मुंबई :  राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजूरी देण्यात आली. 
 
दुकानांच्या पाट्यांवर इंग्रजीत नाव मोठ्या अक्षरात लिहलं जात असल्याचं लक्षात आलं आहे. पण यापुढे दुकानांच्या पाट्यांवर इंग्रजी अथवा इतर भाषेत जेवढ्या मोठ्या अक्षरात नाव लिहलं जाईल तेवढ्याच मोठ्या अक्षरात मराठीत नाव लिहणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता यावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त मनसेचं असल्याचं सांगत मनसैनिकांचं अभिनंदन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र लिहित आपली भूमिका मांडली आहे.


तसंच राज ठाकरे यांनी या निर्णयाबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन केलं आहे, पण याचं श्रेय बाकी कुणीही लाटण्याचा आचरटपणा करु नये असंही म्हटलं आहे. 


राज ठाकरे यांचं पत्र जसंच्या तसं


ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. 


काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.


आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा. 


ह्यात आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका !


पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिकांचं मन:पूर्वक अभिनंदन.