मुंबई :  मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण गेल्या काही काळात घरांच्या वाढलेल्या किंमती पाहता प्रत्येकालाच मुंबईत घर घेणं शक्य होतंच असं नाही. अशा परिस्थितीत म्हाडाच्या (MHADA) परवडणाऱ्या दरातील घरांची आतुरतेने वाट पाहिली जाते. म्हाडाच्या सोडतीकडे तमाम मुंबईकरांचं (Mumbaikar) लक्ष लागलेलं असतं. दरवर्षी लाखो लोक म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करतात. मात्र हा अर्ज करताना खबरदारी घ्या, कदाचित बोगस वेबसाईट्समुळे (Fake Website) किंवा चुकीच्या माहितीमुळे तुमची दिशाभूलही होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोसग साईटचा सुळसुळाट
सध्या व्हॉट्सअप, फेसबुक तसच यूट्यूबवर अवैधरित्या म्हाडाचं बोधचिन्ह (MHADA Logo) वापरून म्हाडाच्या प्रकल्पांबाबत सर्रासपणे चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. मुंबई मंडळाच्या येऊ घातलेल्या सोडतीबाबत 'म्हाडा'चे बोधचिन्ह अनधिकृतरित्या वापरुन म्हाडाच्या प्रकल्पांची, त्यांच्या आकारमानाची, किमतींची अवास्तव माहिती प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर नागरिकांना फेक लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितलं जातं आणि लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. 


त्यामुळे अर्जदारांच्या सुरक्षेसाठी आता म्हाडा प्राधिकरणानेच एक पाऊल पुढे टाकलंय. अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट्सवर अर्ज भरावेत असं आवाहन म्हाडा प्राधिकरणाकडून करण्यात आलंय. तसंच याव्यतिरिक्त कोणत्याही समाजमाध्यमांची, त्रयस्थांची, संस्थांची किंवा इतर मध्यस्थांची मदत घेण्यात आलेली नाही असंही म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. 


म्हाडातर्फे आवाहन
म्हाडातर्फे कोणतेही व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले नाहीत अथवा कोणत्याही संकेतस्थळाला माहिती देण्यात आलेली नाही. अशाप्रकारे बोगस Whastapp ग्रुप्स किंवा संकेत स्थळावर देण्यात आलेल्या लिंकवर कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये  असं आवाहन म्हाडातर्फे करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस मुंबई मंडळातर्फे सदनिका विक्रीकरिता वर्तमानपत्रांतून किंवा म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस अर्जदारांना अर्ज रक्कम आणि अनामत रक्कम भरण्याकरिता लिंक खुली करण्यात येईल. ज्यामध्ये म्हाडाच्या बँक खात्याबाबतची माहिती नमूद करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आलेली आहे.


म्हाडाची अधिकृत साईट
सदनिका विक्रीकरता म्हाडाकून निश्चित प्रणाली कार्यरत करण्यात आलीय. सोडत प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी https://www.mhada.gov.in तसंच https://housing.mhada.gov.in याच म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळांचा वापर करावा. याशिवाय मोबाईलवर MHADA HOUSING LOTTERY SYSTEM  हे ऍप उपलब्ध करून देण्यात आलंय. अर्जदारांसाठी नोंदणी निशुल्क असून कोणत्याही प्रकारे फी किंवा शुल्काची मागणी केली जात नाही. अर्जाची रक्कम आणि अनामत भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून लिंक खुली केली जाईल अशी माहितीही म्हाडाच्या वतीनं देण्यात आलीय. 


 सदननिका विकीसाठी म्हाडाने कोणतेही प्रतिनिधी, सल्लागार, प्रॉपर्टी एजंट तसच मध्यस्थ-दलालांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नयेत. अन्यथा घर मिळवण्याच्या नादात तुमची आहे ती पुंजीही लुटली जाईल.