सचिन गाड, झी मीडिया, मुंबई : खरेदी करताना फायनान्स कंपन्यांकडून अर्थ सहाय्य घेणाऱ्यांसाठी ही बातमी... कर्ज घेताना तुमची सगळी माहिती कुणालाही देऊ नका... कारण, मुंबई पोलिसांनी नुकतंच एका टोळीला अटक केलीय... ज्यांनी सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा वेगळाच आणि नवीन मार्ग शोधून काढला होता. या टोळीने एका प्रतिष्ठीत फायनान्स कंपनीच्या ग्राहकांचा डेटा चोरला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या डेटाच्या मदतीने ही टोळी सामान्य ग्राहकांच्या नावाने कर्ज काढून बिनधास्त शॉपिंग करायची... गेल्या तीन - चार महिन्यांतच या टोळीनं तब्बल ३२ लाख रूपयांचं शॉपिंग करून अनेक ग्राहकांना फसवलं, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल बाजारे यांनी दिलीय. 


या टोळीतील रमीझ मोहम्मद हुसेन शेख हा आधी इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करायचा. या दुकानातून त्याने एका फायनान्स कंपनीच्या ग्राहकांचा डेटा चोरी केला. रमीझने डेटा चोरल्यानंतर अबुबकार मोहम्मद शेख डेटा असलेल्या ग्राहकांचे बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवायचा. मग ही टोळी या कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपनीकडून कर्ज घ्यायची...


आत्ता पर्यंत २२ ग्राहकांची ३२ लाख रूपयांची फसवणूक झाल्याचं चौकशीत समोर आलं असलं तरी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या वेळी कोणालाही आपली सगळी माहिती देताना सावधान असा इशारा पोलिसांनी दिला आहे.