बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; पाच ते दहा हजारांची पगारवाढ
दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह वेतनही (बोनस) मिळेल.
मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून वेतनवाढीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना अखेर बाप्पा पावला आहे. बेस्ट प्रशासनाकडून गुरुवारी करण्यात आलेल्या घोषणेनुसार कर्मचाऱ्यांना साधारण पाच ते दहा हजारांची पगारवाढ मिळेल. २०१६ ते २०२१ या पाच वर्षांसाठी हा वेतन करार तयार करण्यात आला आहे. बेस्टच्या तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल. तसेच दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह वेतनही (बोनस) मिळेल. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरेल.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वानाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यात झालेल्या मातोश्रीवरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना वेतन देण्याच्या मागणी मान्यता मिळाली होती.
त्यामुळे आगामी काळात होणारे बेस्टचा संपही टळणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आठ दिवसांचा ऐतिहासिक संप केला होता. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले होते.