मुंबईत बेस्टच्या चालत्या बसने घेतला पेट
बसने पेट घेताच चालक-वाहक आणि बसमधील प्रवाशी बसबाहेर पडले.
मुंबई : धावत्या बेस्ट बसला आग लागल्याचा प्रकार मुंबईतील गोरेगावमध्ये घडला आहे. ही घटना ३ मे च्या सकाळी घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गोरेगाव पूर्वेकडील गोकुळधाम भागात हा प्रकार घडला आहे. ३४४ क्रमांकाची ही बस होती. आज सकाळी (३ मे) साडे सातच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये प्रवाशीसंख्या कमी होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु बस जागीच जळून खाक झाली आहे.
बसने पेट घेताच चालक-वाहक आणि बसमधील प्रवाशी बसबाहेर पडले. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ३४४ क्रमांकाची ही रिंग रुट बस आहे. ही बस गोरेगाव स्टेशन पूर्व, दिंडोशी सत्र न्यायालय ते गोरेगाव स्टेशन अशी धावते.
याआधीही अशाच प्रकारची घटना २ वर्षापूर्वी घडली होती. १५ जानेवारी २०१७ ला कूर्ला-अंधेरी रोडवरील चकाला येथे अंधेरीच्या दिशेने जात असलेल्या ३९६ क्रमांकाच्या बेस्ट बसने पेट घेतला होता.