मुंबई:  महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून दिवसेंदिवस वाढतं लैंगिक  शोषणाचं प्रमाण पाहता याकडे आता बरंच गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलं आहे. एकिकडे घोषणा आणि आश्वासनांच्या गराड्यात अडकलेल्या मंडळींना या मुद्द्याकडे पाहण्यासाठी पुरेसा वेळ नाही असा सर्वसामान्य जनतेचा समज आहे. तर दुसरीकडेच हीच सर्वसामान्य मंडळी आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी म्हणून मोठ्या जबाबदारीने काही पावलं उचलताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई, हे एक असं शहर आहे जिथे झगमगाट आहे, गर्दी आहे, आक्रोशही आहे. अशा या शहरात रात्रीच्या वेळी महिलांनी प्रवास करणं कितपत सुरक्षित आहे हा वादाचा मुद्दा. 


मुंबईतील बऱ्याच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत महिलांचा वावर असतो. पण, काही भाग मात्र याला अपवाद आहेत. असाच एक परिसर म्हणजे आरे कॉलनी. 


संध्याळच्या आणि रात्रीच्या वेळी अगदी उशिरा आरे कॉलनीमध्ये असणारी वर्दळ तुलनेने कमी होत जाते. ज्यामुळे अनेकदा हा परिसर निर्मनुष्य असतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


अशाच या परिसरातून काही दिवसांपूर्वी बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या २५ वर्षीय महिलेला खऱ्या अर्थाने माणुसकीचा अनुभव आला. ज्याविषयी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना माहिती दिली. 


मंतशा शेख असं तिचं नाव असून ट्विटरच्या माध्यमातून तिने हा अतिशय सुरेख प्रसंग सर्वांपर्यंत पोहोचवला.


'म्हणून मला मुंबई आवडते...', अशीच सुरुवात करत तिने पुढे लिहिलं, 'मी बस क्रमांक ३९८ (मर्यादित) च्या चालकांचे आभार मानते. एका निर्मनुष्य बस थांब्यावर त्यांनी मला सोडलं. त्यावेळी मध्यरात्रं उलटून दीड वाजले होते. मी उतरते वेळी कोणी आणण्यासाठी येणार आहे का, असं त्यांनी मला विचारलं.'



मंतशाला कोणीही आणण्यासाठी येणार नसल्याचं कळताच, त्या शांत रस्त्यावर चालकाने तिला ऑटोरिक्षा मिळेपर्यंत जवळपास दहा मिनिटांसाठी बस थांबवून ठेवली. 


'मुंबई मिरर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तिने साकीनाका परिसरातून बस पकडली होती. जी आरे कॉलनीत पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता. 


इतकच नव्हे तर तिची रिक्षा निघून योग्य दिशेने जात आहे ना, याकडेही चालक आणि वाहकाचं लक्ष होतं. त्या दोन्ही 'बेस्ट' कर्मचाऱ्यांनी अगदी नि:स्वार्थपणे आपली जबाबदारी किंबहुना माणुसकी निभावली. त्यांचं हे सुरेख वागणं पाहून मंतशाने '...म्हणूनच मी या शहराच्या प्रेमात आहे' असं म्हणत सर्वांचच लक्ष वेधलं. 


प्रशांत मयेकर आणि राज दिनकर अशी त्या कर्मचाऱ्यांची नावं असून, खऱ्या अर्थाने आपणच बेस्ट असल्याचं त्यांनी या कृतीतून दाखवून दिलं आहे. ज्यामुळे आजच्या घडीला संपूर्ण मुंबईसाठी ते कोणा एका हिरोपेक्षा कमी नाहीत आणि अशाच मुंबईकरांमुळे मंतशासारखे अनेकजण म्हणतात 'ये है मुंबई मेरी जान'.