बेस्ट संघटना संपावर ठाम ! नवव्या दिवशी प्रवाशांचे हाल सुरूच
संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात अकरा वाजता सुनावणी होणार आहे.
मुंबई : बेस्टचा संप सुरूच राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी केलाय. त्यामुळे सलग नवव्या दिवशी प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. तर दुसरीकडे उच्च न्यायालयातही तोडगा निघाला नाही. आता आणखी चर्चा सुरू ठेवण्यात अर्थ नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात अकरा वाजता सुनावणी होणार आहे. यावेळी बेस्ट संपाबाबत निर्णय अपेक्षित आहे.
संघटना ठाम
बेस्ट कर्मचार्यांचा संप मिटवण्यासाठी उच्चाधिकार समितीनं १० टप्प्यांची पगारवाढ सुचवली आहे. पण वेतनाचे १० टप्पे कमी आहेत, २० टप्पे हवे, अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. संप मागे घ्या, कोणावरही कारवाई केली जाणार नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, संप करून मागण्या मान्य करून घेणे म्हणजे आमच्या डोक्यावर बंदुक ठेवण्यासारखे आहे.
आम्ही कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी तयार आहोत पण संपावर राहून नाही, असं बेस्ट समितीनं न्यायालयात सांगितले पण कर्मचारी संघटना स्वत:च्या मागणीवर ठाम आहेत
'मातोश्री'चा डाव
'मातोश्री'कडून या संपकरण्यांना संपवायचे आहे. त्यासाठी खासगिकरणाचा डाव आखला जात आहे, असा थेट आरोप बेस्ट कामगार कृती समितीचे निमंत्रक नेते शशांक राव यांनी केला आहे. ते म्हणालेत, 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा आहे, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ आणण्याचा प्रयत्न आहे.' यावेळी लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, असे सांगतानाच उच्चाधिकार समितीचा नवा प्रस्ताव म्हणजे बेस्ट कामगारांचे मृत्यूपत्र असल्याची घणाघाती टीका राव यांनी केली.