मुंबई : बेस्टच्या संपाचा मुंबईतल्या रुग्णांनाही फटका बसतो आहे. परळमध्ये असलेल्या टाटा रुग्णालयात मुंबईतून आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण कर्करोगाच्या उपचारांसाठी येत असतात. तर केईएम रुग्णालयातही देशभरातील रुग्णांची गर्दी असते. या दोन्ही रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी दादर, परळ रेल्वे स्थानकांवरुन बसेस असतात. पण बेस्टचा संप असल्यानं रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. बेस्टच्या संपामुळे टॅक्सीही लवकर उपलब्ध होत नाही आहेत. त्यामुळे रुग्णांना भर उन्हात रुग्णालयात जाण्यासाठी टॅक्सीची वाट पाहात उभं राहावं लागत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेले अनेक रुग्ण या दोन्ही रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येतात. त्यात बेस्टचा संप असल्यानं या रुग्णांना त्रासही सहन करावा लागतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. बेस्टच्या वाहतूक विभागाच्या 'ऐतिहासिक' अशा संपाचा आज सातवा दिवस आहे. बेस्ट संपाच्या सातव्या दिवशी सकाळी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. परंतु या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही, अशी माहिती 'बेस्ट कृती समिती' या कामगार समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली. 


दुसरीकडे या संपावरुन राजकीय चर्चा देखील रंगली आहे. कालच शिवसेना-भाजपचं भांडण हे प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे. नवरा-बायकोचं भांडण असतं तर घटस्फोट झाला असता. असं म्हणत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनाबरोबर युती हवी असल्याने भाजपचे नेते काठावर शांत बसून आहेत. सध्या शिवसेनेवर कोणतीही टीका न करण्याच्या आणि सबुरीने घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा जागा वाटपबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत भाजप शिवसेनबाबत सध्या दमानं घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.