मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच गणितं सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत पहारेकऱ्यांची भूमिका बजावणारी मुंबई भाजप सध्या हाताची घडी घालून शांत बसली आहे. बेस्टच्या वाहतूक विभागाच्या 'ऐतिहासिक' अशा संपाचा आज सातवा दिवस आहे. मुंबईत प्रवास करणाऱ्याचे मोठे हाल होत असताना शिवसेनेला खिंडीत गाठायची मोठी संधी भाजपाकडे आहे. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनाबरोबर युती हवी असल्याने भाजपचे नेते काठावर शांत बसून आहेत. सध्या कोणतीही टीका शिवसेनेबरोबर न करण्याच्या, सबुरीने घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपाचे विशेषतः मुंबई भाजपाचे नेते सोशल मीडियावरही तलवार म्यान करून बसल्याचं चित्र बघायला मिळत आहे. लोकसभा जागा वाटपबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत भाजप शिवसेनबाबत सध्या दमानं घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच शिवसेना-भाजपचं भांडण हे प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे. नवरा-बायकोचं भांडण असतं तर घटस्फोट झाला असता, असं म्हणत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.


दरम्यान, बेस्ट संपाच्या सातव्या दिवशी सकाळी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. परंतु या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही, अशी माहिती 'बेस्ट कृती समिती' या कामगार समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटलंय.



काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मात्र शिवसेनेवर एका कार्टुनच्या माध्यमातून टीका केलीय. मुंबईच्या गिरण्या खाणाऱ्यांचा आता बेस्ट गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा आरोप राणे यांनी या माध्यमातून केलाय.