आज संप न मिटल्यास पालिकेचे कर्मचारीही संपात उतरणार
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपात आता बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारीही आजपासून सहभागी होणार आहेत.
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाला आता मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांनीही पाठींबा दिला आहे. त्यामुळे आजच्या दिवसात संप न मिटल्यास उद्यापासुन पालिकेचे कर्मचारीही बेस्ट कामगारांच्या संपात सहभागी होणार आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपात आता बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारीही आजपासून सहभागी होणार आहेत. बेस्टच्या वीज पुरवठा संघटनेचे ६००० कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मुंबईत अंधारात बुडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सामान्य मुंबईकर करत आहेत.
बेस्ट संपाचा तिढा कायम, बैठक निष्फळ
संपाचा इशारा
बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेली बैठक फिस्कटल्याने कर्मचाऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.आज संप न मिटल्यास म्युन्सिपल मजदूर युनियनचा संपात सहभागी होण्याचा इशारा अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.त्यामुळे हा संप चिघळणार हे स्पष्ट आहे. या सर्वाचा परिणाम यंत्रणेवर पडणार असून मुंबईकरांचे आणखी हाल होणार आहेत.
चर्चा फुकट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासन, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यात रात्री उशिरापर्यंत महापौर निवासस्थानी बैठक झाली. मात्र, काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ही चर्चा फुकट गेली. चौथ्या दिवशी हा संप सुरुच राहणार आहे. दरम्यान, या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत आज सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय देणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.