मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला आहे.  राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. याबाबत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, भारतरत्न आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केले आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.


महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही  अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.  


तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही  आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य आहे.  मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.