मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो पॅक्स फेरी सेवा आजपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता फक्त ४५ मिनिटात मांडव्याला पोहोचता येणार आहे. आज होत असलेल्या उद्घाटनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड आणि कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाऊचा धक्का ते मांडावा जेट्टी रो रो सेवेला आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल अशी घटना. या सेवेमुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. शासनाने मांडावा जेट्टी येथे यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले असून किनारपट्टीच्या भागात सर्वत्र अशी जलवाहतूक सुरु करता येईल का ते आम्ही पाहत आहोत असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. 


तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या. प्रवाशांसाठी ही फेरीसेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरमाराचे प्रमुख, सरखेल कान्होजी आंग्रे यांचा वारसा, एका आधुनिक पद्धतीनं आपण पुढे नेत आहोत, यासेवेमुळे, भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ पाऊण तासात पूर्ण होणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि इंधनात बचत होईल. मुंबई-गोवा मार्गावरची वाहतुक कोंडी कमी होण्यासही मदत होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


शिवाय, कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव लक्षात घेत फेरीसेवेचा आज होत असलेला औपचारिक उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याचे देखील पवार यांनी स्पष्ट केले. या फेरीसेवेमुळे प्रवाशांचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे.