भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी, दोषींवर कारवाई करणार - मुख्यमंत्री
भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय.
मुंबई : पुणेमधील भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय. तसेच कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
दोषींवर कठोर कारवाई
भीमा कोरेगाव घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तींची नियुक्ती करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणारच, असे सांगत नागरिकांनी समाजात शांतता राखावी, असे आवाहन केले.
सीसीटीव्ही फूटेजची मदत
भीमा कोरेगाव घटनाप्रकरणी चौकशीसाठी सीसीटीव्ही फूटेजची मदत घेतली जाईल. सर्वांनी कायद्याचे पालन करावे. दोन समाज समोरसमोर येणार नाही याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, माध्यमांनीही या प्रकरणात पहिल्या दिवशी जो संयम दाखवला तो यापुढेही दाखवावा आणि शांतता राखण्यात सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. आम्ही चौकशीतून शेवटापर्यंत जाऊ, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.