मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silve Oak) या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) आंदोलन केलं होतं. याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) गेल्या चार दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिथावणीखोर भाषण करुन एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकावल्याचा आरोप करत पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली. त्यांच्याबरोबरच १०९ एसटी कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती. 


सदावर्ते यांना पोलिसांनी नऊ तारखेला अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पण याप्रकरणी आणखी तपास करायचा आहे असं सांगत सरकारी वकिलांनी त्यांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवस म्हणजे १३ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली होती.


आज सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली, आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी वकीलांनी सदावर्ते यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. 


दरम्यान, अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी या दोघांना पोलीस कोठडी तर बाकी सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


सदावर्ते यांच्या वकीलांचा युक्तीवाद
गुणरत्न सदावर्ते यांनी रक्कम जमा केली असा आरोप करण्यात आला आणि त्यात त्यांच्या पत्नीलाही गोवण्यात आलं. आता चौकशीत काहीतरी निष्पन्न करायचं म्हणून नवीन कलम लावली जात आहेत. चौकशीची दिशा एकदम बदलली जात आहे असा दावा सदावर्ते यांच्या वकिलांनी केला.