Corona Update : मुंबई लोकल ट्रेन बंद होणार? काय म्हणाले आरोग्यमंत्री
राज्यात विकएण्ड निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत काय ठरलं
मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊनचा सध्या कोणताही विचार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
बैठकीत काय ठरलं?
राज्यात दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. याबाबत शरद पवार यांना अधिक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. आरोग्यविभागाची बैठक घेतली. या बैठकीत सध्याची परिस्थिती, त्यावरचे उपाय आणि काय निर्बंध आहेत त्याची अंमलबजावणी होत आहे का याचा आढावा घेतला तसंच अंमलबजावणी होत नसेल तर ते स्ट्रीक करा याचे निर्देश दिले.
गर्दीबाबत नियोजन
ज्या अत्यावश्यक गोष्टी नाहीत, आणि त्यामुळे रुग्ण वाढत असतील तर त्या बंद करायचा का याबाबत चर्चा झाली. तरुण वर्ग मॉल्स, रेस्टॉरंटमध्ये गर्दी करतो तिथे काय करता येईल का, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. शरद पवार दररोज यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
लसीकरण वाढवण्यावर भर
लसीकरण वाढवण्याबाबत या बैठकीत एकमत झालं, लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवण्यात आलं. शरद पवारांनी परिस्थिती समजून घेतली, आरोग्य विभागाकडून कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करु नये याबाबतची माहिती मागवल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.
शरद पवार घेणार बूस्टर डोस
तसंच शरद पवार यांना लस घेऊन ९ महिने झाले आहेत, कदाचित १० जानेवारीला ते बूस्टर डोस घेतील अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
लॉकडाऊनबाबत कोणताही विचार नाही
विकएण्ड, लॉकडाऊनबाबत चर्चा झाली आहे, पण कोणताही निर्णय झालेला नाही, तसंच मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार तूर्त नाही असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
मुंबई आणि राज्यातील ८० टक्के बेड्स रिकामे आहेत, संख्या वाढत असली तरी ऑक्सीजनची मागणी वाढलेली नाही, मृत्यूचा आकडा वाढलेला नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.