MahaRERA : आताची मोठी बातमी! तुम्ही बुक केलेलं घर या गृहप्रकल्पात आहे का? महारेराच्या रडारवर अनेक बिल्डर
MahaRERA : राज्यातील 2 हजार गृहप्रकल्पांना नोटीसा, आणखी 16 हजार गृह प्रकल्पांना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याची माहिती
MahaRERA Notice : राज्यातील 2 हजार गृह प्रकल्पांना (Housing Projects) महारेराने (Maharera) नोटीसा पाठवल्या आहेत. आणखी 16 हजार गृह प्रकल्पांना नोटीसा पाठवल्या जाणार आहेत. इतकंच नाही तर 30 दिवसांत त्रृटींची पुर्तता न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महारेराने गेल्या 5 वर्षांत नोंदविलेल्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांची झाडाझडती सुरु केली आहे. प्रकल्पाशी संबंधित 'बंधनकारक' माहिती महारेराच्या संकेतस्थळावर (WebSite) नोंदविण्यात तसंच ती माहिती अपडेट करण्यात बिल्डरांकडून (Buider) हलगर्जीपणा केला जात असल्याने महारेराने हे पाऊल उचललं आहे.
ग्राहकाला वेळोवेळी प्रकल्प स्थिती कळण्यासाठी बिल्डरने दर 3 महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर अध्ययावत करणे बंधनकारक असतं.
पण, बहुतांश बिल्डरांनी नोंदणी झाल्यापासून ही माहिती अध्यायावत केलेली नाही. त्यामुळे महारेराने अशा सर्व बिल्डरांना त्रुटींबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
रेरा कायद्यानुसार प्रवर्तकाकडे ग्राहकांकडून आलेल्या पैशांपैकी 70 टक्के पैसे रेरा नोंदणी क्रमांक निहाय स्वतंत्र खाते उघडून त्यात ठेवणे आवश्यक आहे. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर हे पैसे काढताना प्रकल्प पूर्ततेची टक्केवारी, गुणवत्ता, अदमासे खर्च याचे अनुक्रमे प्रकल्प अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ आणि सनदी लेखापाल यांचे प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक आहे.
प्रकल्पातील किती सदनिका, प्लॉट्स विकले याची तिमाही वस्तुसूचीही( इन्व्हेंटरी) संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य आहे. सर्वात महत्त्वाचे , दर सहा महिन्याला प्रकल्प खात्याचे लेखापरीक्षण करून प्रत्येक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांनी , या खात्यातून काढलेली रक्कम प्रकल्प पूर्ततेच्या प्रमाणात काढली आणि किती खर्च झाला याचे ऑडिट सादर करणे बंधनकारक आहे.