मुंबई : हार्ट अटॅक आल्याने  अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता चक्क त्याला बाईकवरून रूग्णालयात नेलं. हा सगळा प्रकार तुम्हाला थ्री इडियट सिनेमातील वाटेल. पण ही घटना खरीखुरी असून मुंबईतील माझगांव परिसारत ही घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला तात्काळ सेवा मिळावी हे महत्वाचं असतं. मात्र मुंबईच्या भरगच्च रस्त्यावरून मार्ग काढणं हा एक टास्कच असतो. अशावेळी अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता. त्या व्यक्तीला गोल्डन अवरमध्ये रूग्णालयात नेण्यासाठी बाईकवरून नेण्याचा निर्णय थोडा विचित्र वाटू शकतो. पण हाच निर्णय माझगाव भागातील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय एका हॉटेल मॅनेजरला अवलंबण्यात आला आहे. हार्ट अटॅक आल्यावर गोल्डन अवरमध्ये त्यांच्यावर उपचार झाले आणि त्यांचा जीव वाचला. मात्र हे शक्य झालं ते, त्यांनी घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे. छातीत वेदना होत असतानाही त्यांनी रुग्णालयात जाण्यासाठी बाईकवर जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे दक्षिण मुंबईत संध्याकाळची गर्दी असतानाही लवकरात लवकर जसलोक रुग्णालयापर्यंत पोहोचणं त्यांना शक्य झालं.


“हार्ट अटॅक आल्यावर लवकरात लवकर उपचार सुरु होणं गरजेचं असतं. यामुळे शक्य होईल तितक्या घाईने रुग्णालयापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. या व्यक्तीचा जीव वाचला कारणं बाईकचा वापर करुन ते लवकर रुग्णालयात पोहोचले. अशा परिस्थीतीमध्ये डॉक्टरांनी येऊन उपचार करण्याची वाट न बघता आपणच रुग्णालयात पोहोचणं गरजेचं असतं,” असं जसलोक रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ शोएब पदारिया यांनी सांगितलं.


या हॉटेल मॅनेजरला १७ ऑगस्टच्या संध्याकाळी छातीत कळा यायला सुरुवात झाली. त्यांचा लगेचच जवळच्या रुग्णालयात नेऊन इसिजी काढण्यात आला. या इसिजीचे फोटो त्यांच्या कुटुंबियांनी डॉ. पदारियांना व्हॉट्सअॅपवर पाठवले. इसिजीवरुन तो हृदयविकाराचा झटका असल्याचं स्पष्ट झालं आणि डॉ. पदारियांनी हॉटेल मॅनेजरला लगेचच रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.कुटुंबियांनी जसलोक रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. पण संध्याकाळच्या ट्रॅफिकमधून कार किंवा अॅम्ब्युलन्सला वाट काढणं सोपं नव्हतं. म्हणून छातीत वेदना होत असताना हॉटेल मॅनेजरने बाईकवरुन जसलोक रुग्णालय गाठलं. तिथे आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर लगेचच उपचारांना सुरुवात झाली.


“त्यांची प्रकृती आता सुधारत असून त्यांना धोका नाहीये. त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिलाय. यावरुन सगळ्यांनी धडा घ्यायला हवा,” असं डॉ. शोएब पदारिया यांनी सांगितलं. नुकतचं राज्यात बाईक अॅम्ब्युलन्सचा शुभारंभ झाला. मुंबईसारख्या वर्दळीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये लवकर पोहोचता यावं हाच विचार डोक्यात ठेऊन अॅम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात आली आहे.