22,250 कोटींचा मालक मुंबई लोकलने प्रवास करतो तेव्हा; Viral Video पाहिलात का?
Niranjan Hiranandani : मुंबईतील प्रसिद्ध अब्जाधीश आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी हेही वाहतूककोंडीमुळे हैराण झाले आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी त्यांनी लोकल ट्रेनचीही मदत घेतली.
Billionaire Niranjan Hiranandani at Mumbai local train : स्वप्नांची नगरी म्हटली जाणारी मुंबई इथल्या प्रत्येक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. उद्योगपतींपासून ते बॉलिवुड कलाकारांपर्यंत, मजूरांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनाच मुंबई प्रिय आहे. मात्र मुंबईत प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या कामासाठी धावतानाच दिसत असते. पण वाहतुकीच्या समस्यांमुळे त्याला बरीच दगदग करावी लागते. त्यावेळी सामान्यांच्या मदतीला धावून येते ती फक्त मुंबई लोकल. रस्त्यांवर तासनतास वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा मुंबईकर लोकलला पसंती देत असतात. यामध्ये राजकारणी देखील मागे राहिले नाहीत. इच्छूक स्थळी पोहोचण्यासाठी मोठे राजकारणी देखील मुंबई लोकलचा वापर करतात. आता यामध्ये भर पडली आहे ती अब्जाधीश उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांची.
मुंबईत वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे लोकल ट्रेन. अब्जाधीश आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनाही इथल्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे 73 वर्षीय निरंजन हिरानंदानी यांनीही वेळ वाचवण्यासाठी चक्क मुंबई लोकलने प्रवास केला आहे. कमी वेळात उल्हासनगरला पोहोचण्यासाठी निरंजन हिरानंदानी यांनी मुंबई लोकलचा वापर केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हिरानंदानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रणी नाव असलेले प्रसिद्ध अब्जाधिश उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहेत. त्याच्या व्हिडिओवर व्ह्यूजचा ओघ थांबत नाहीये. व्हिडीओ पोस्ट केल्यापासून त्याला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एसी कोचमध्ये मुंबई ते उल्हासनगर हा प्रवास खूप आनंददायी होता. वेळ वाचवण्यासाठी आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला, असे कॅप्शन हिरानंदानी यांनी या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये ते इतर प्रवाशांशी गप्पा मारतानाही दिसत आहेत. हिरानंदानी यांनी लोकल ट्रेनमधील प्रवासाचे खूप कौतुक केले आहे.
नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
हिरानंदानी यांच्या या व्हिडीओवरुन काही नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली देखील उडवली आहे. त्यांचा प्रवास सोपा होता कारण ते गर्दी नसलेल्या वेळेत प्रवास करत होते, असा एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने याला पीआर स्टंट म्हटले. आणखी एका युजरने श्रीमंत लोक जेव्हा पहिल्यांदा ट्रेनने प्रवास करतात तेव्हा ते व्हिडीओ रेकॉर्ड करतात, असं म्हटलं आहे.
दरम्यान, निरंजन हिरानंदानी हे हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते या ग्रुपचे संस्थापकही आहेत. त्यांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. या ग्रुपचे देशातील अनेक भागात प्रकल्प आहेत. जून 2021 पर्यंत, फोर्ब्सने निरंजन हिरानंदानी यांचा भारतातील 100 सर्वात श्रीमंत लोकांमध्ये समावेश केला. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 22,250 कोटींच्या आसपास आहे.