मुंबई : दहावी बारावी बोर्डाची ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मात्र, या निर्णयाला विरोध करत राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलनं केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत धारावी परिसरात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे पोलिसांना येथे सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या घटनेवरून आता भाजप आक्रमक झाली आहे.


नागपूर-मुंबई यासह राज्यात काही ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर अचानक येऊन आंदोलन करत होते. याची माहिती गृह विभागाला नव्हती का? राज्याचे गृहमंत्री झोपले होते का? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.


तर, निष्पाप विद्यार्थ्यांना हिटलरशाहीपद्धतीने मारहाणीचा हा प्रकार दुर्दैवी आहे. सरकारने गांभीर्याने हा विषय हाताळला असता तर ही वेळ आली नसती. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांवर कोणी दबाव आणला हे महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.


शिक्षण क्षेत्रातील काळा इतिहास - दरेकर
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील काळा इतिहास म्हणून या घटनेची नोंद होईल. दोन–तीन महिने विद्यार्थी, पालक यासंदर्भात भूमिका घ्यायला सांगत आहेत. मात्र, शासन गंभीर नव्हते. मग अशा प्रकारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आपल्या या गंभीर प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.


खरे तर शासनाने समन्वय साधायला हवा होता. चर्चा करून या विषयावर काय मार्ग काढता आला असता. परंतु आम्हाला वाटते तेच करू, सगळ्यांना गृहीत धरायचे आणि सत्ता आमची असल्यामुळे पोलिसी बळाचा वापर करून आम्ही आंदोलन चिरडून टाकू शकतो हे पुन्हा एकदा यानिमित्ताने सरकारने दाखवून दिले आहे. 


घटनेच्या चौकशीचे आदेश - गृहमंत्री
धारावी आणि राज्यातील इतर भागात झालेल्या विद्यार्थ्यी आंदोलनाची दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश तसेच, येथील गर्दी नियंत्रणात आणण्याच्याही सूचना त्यांनी पोलीसांना दिल्या आहेत.