मुंबई : मेट्रो ३ च्या आरे कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मेट्रो कारशेडला भेट देवून पाहणी करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तर दुसरीकडं कुलाब्याचे आमदार राहूल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी अभ्यास न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो कारशेड कामाला दिलेल्या स्थगितीवरून आता शिवसेना भाजपमध्ये राजकारण सुरु झालं आहे. पर्यावरणाच्या मुद्यावरून कारशेड कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानंतर याचा परिणाम संपूर्ण मेट्रो प्रकल्पावर होणार असल्याचं भाजपकडून सांगितलं जातं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरणप्रेमींचा विरोध डावलून आरे इथं मेट्रो कारशेड उभारणीला हिरवा कंदील दर्शवला होता. 


कारशेडच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण झालं असून बांधकाम सुरु झालं होतं. त्यामुळे आता एक ही झाड तोडण्याची गरज नसताना ही स्थगिती कशासाठी दिलीय, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.


मेट्रो ३ चा सर्वाधिक लाभ कुलाब्याला होणार असल्यानं कुलाब्याचे भाजप आमदार राहूल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी अभ्यास न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे.


भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच भाजपचे आमदारही मेट्रोच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्यामुळे आता विकासाच्या या प्रकल्पाला राजकारणाचं गालबोट लागतं आहे.