मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजपमध्ये जागावाटप करताना २० ते २५ पेक्षा जास्त जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील विद्यमान आमदारांनी सेना-भाजपमध्ये केलेला पक्षप्रवेश तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मतांची टक्केवारी, गेल्या पाच वर्षातील बदलली परिस्थिती अशा विविध सर्व शक्यता लक्षात घेऊन काही विधानसभा जागांची अदलाबदल केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये चार ते पाच जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये गोरेगाव, नायगाव या दोन प्रमुख जागांचा समावेश आहे. विद्यमान आमदारांनी सेना भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने ऐरोली, उस्मानाबाद, अकोले, सिल्लोड या जागांवर सेना भाजपमध्ये अदलाबदल केले जाण्याची शक्यता आहे.


शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सोमवारीच जागावाटपाच्या चर्चेची दुसरी फेरी पार पडली होती. विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते. एवढा कमी वेळ शिल्लक असताना भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपावरून संदिग्धता आहे. त्यातच आता युतीच्या घटकपक्षांमध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.


युतीचा फॉर्म्युला काय?
भाजपचे सध्या १२२ आमदार तर शिवसेनेचे ६३ आमदार आणि मित्रपक्षांच्या १८ जागा याची बेरीज केली तर ती होते २०३, एकूण २८८ जागांमधून २०३ वजा केले तर उरतात ८५ जागा. या ८५ जागांचे निम्मे केले तर ४२.५ म्हणजेच साधारण ४३ जागा होतात. आता यातील भाजपच्या वाट्याला १२२ आणि ४३ म्हणजेच १६५ आणि शिवसेनेच्या ६३ आणि ४३ अशा १०६ जागा होतात. पण शिवसेनेने ११० पेक्षा कमी जागा स्वीकारायला नकार दिला आहे.   


काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या आमदारांच्या जागावर हे दोन्ही पक्ष आग्रह धरतील. त्यामुळेच सध्याची ही राजकीय स्थिती पाहता युती होण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जाते आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचे नेते अजूनही युती होणारच असा दावा करत आहेत.


भाजपकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष पुढे आला होता. तर महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.