काँग्रेसमुळे भाजपची विरोधी पक्षाच्या भूमिकेत जायला गोची
महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप जाणूनबुजून पहारेकऱ्याच्या भूमिकेत होती. आता भाजपला विरोधी पक्षाच्या भूमिकेत जायचंय... पण गोची केलीय ती काँग्रेसनं.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अजून अडीच वर्षे शिल्लक असली तरी भाजपा आतापासूनच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलीय. सध्या मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याच्या भूमिकेत असलेली भाजप आता विरोधकांच्या भूमिकेत येणार आहे. या विरोधाला धार आणायची असेल तर विरोधी पक्षनेतेपद हवं आणि त्यामुळेच ते मिळवण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
२०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. शिवसेनेपेक्षा केवळ २ जागा भाजपला कमी मिळाल्या होत्या. पण त्यावेळी भाजपनं शिवसेनेला अनुकूल अशी पहारेक-यांची भूमिका स्वीकारली होती. त्यामुळं पालिकेतील विराेधी पक्षनेतेपद काँग्रेसकडं आलं. आता जर भाजपला हे विराेधी पक्षनेतेपद हवं असेल तर काँग्रेसल ते सोडावं लागेल. तरच भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळेल.
राज्याप्रमाणं पालिकेतही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आला आणि काँग्रेस सत्तेमध्ये सामील झाली तर; भाजपचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग सुखकर होणाराय. तरीही त्यासाठी २०२० मधील मार्च- एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागेल, कारण तेव्हाच विविध समित्यांच्या निवडणुका असणारेत.
मुंबई महापालिकेत काय करायचं, हे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ठरलेले नाही. परंतु यामुळं अडचण झालीय ती भाजपची. काँग्रेसच्या भूमिकेवर भाजपचं पालिकेतलं विरोधी पक्षनेतेपद अवलंबून असलं तरी तोपर्यंत भाजप काही आता गप्प बसणार नाही.