Dahi Handi : आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपची दहीहंडी
मुंबईत पुन्हा एकदा दहीहंडीचा उत्साह दिसत आहे. राज्य सरकारने निर्बंध हटवल्याने सण उत्साहात साजरे करण्यासाठी पथक सज्ज आहेत. पण राजकीय हंड्यांकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे.
मुंबई : वरळीतील जांबोरी मैदानात आता भाजप (BJP) दहीहंडी बांधणार आहे. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मतदारसंघात ही दहीहंडी साजरी केली जाणार आहे. वरळीमधील जांबोरी मैदानात (Jamboree maidan) यंदा भाजपकडून दहीहंडी साजरी करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. (BJP Dahi handi in worli)
वरळीतील शिवसेना आणि शिवसेनेची दहीहंडी हे गेल्या कित्येक वर्षांचं समीकरण आहे पण आता याला भाजपकडून छेद दिला जाणार आहे. जांबोरी मैदानात दहीहंडी साजरी करण्यासाठी भाजपला परवानगी मिळवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दहीहंडी काही दिवसांवर आली आहे. शिंदे सरकारने सर्व निर्बंध हटवत सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे दहीहंडी पथक आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पण राजकीय हंड्या देखील चर्चेत असणार आहेत.
कोणकोणते नेते यावेळी हंड्या बांधतात हे पाहावं लागेल. दहीहंडी बांधण्यासाठी यंदा स्पर्धा देखील दिसणार आहे. त्यामुळे येथे ही कुरघोडीचा प्रयत्न केला जावू शकतो.