मुंबई: समृद्धी महामार्ग पूर्णत्वास येण्यापूर्वीच नामकरणावरून स्पर्धा सुरु झाली आहे. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून समृद्धी महामार्गास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा विचार होता. मात्र, शिवसेनेने बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रह धरला होता. तसे पत्रच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे पेच निर्माण झाला होता. 



मात्र, आता ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता.