Petrol-Disel Rate | राज्यात पेट्रोल करकपात की धूळफेक?
केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारनं व्हॅट कमी केल्याचा मोठा गवगवा झाला.
मुंबई : केंद्रापाठोपाठ राज्यानंही पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्याचा मोठा गाजावाजा झाला. मात्र ही करकपात फसवी असल्याचा आरोप आता होतोय. भाजपनं याबाबत राज्य सरकारला धारेवर धरलंय. (bjp devendra fadnvis critisized to maharashtra government over to petrol disel rate)
केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारनं व्हॅट कमी केल्याचा मोठा गवगवा झाला. पेट्रोलवर 2 रुपये 8 पैसे तर डिझेलवर 1 रुपया 44 पैसे स्वस्त झाल्याचं सांगितलं गेलं. मात्र आणखी 2 रुपये स्वस्तात पेट्रोल भरायला मिळेल, या अपेक्षेनं पंपावर गेलेल्यांचा प्रचंड हिरमोड झाला.
दुसरीकडे राज्य सरकारनं व्हॅटमध्ये कपात केलीच नाही. केंद्रानं केलेल्या कपातीचा स्वाभाविक परिणाम म्हणून व्हॅट कमी झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर तोफ डागलीये.
महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे.
कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला, असं ट्विट फडणवीसांनी केलंय.
त्यामुळे आता राज्य सरकारची पेट्रोल-डिझेलवरची ही व्हॅट कपात खरी की केवळ धूळफेक असा प्रश्न उपस्थित झालाय. याचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि दिलासा दिला नसेल, तर तो खरोखर देणंही आवश्यक आहे.