मुंबई: राजकारणात कोणीही अस्पृश्य नसते. संपूर्ण निकाल लागू दे, बऱ्याच वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते 'झी २४ तास'शी बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयाला येण्याचे संकेत दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या नेत्यांनी महायुतीला २२० जागा मिळतील असा दावा केला होता. तर चंद्रकांत पाटील यांनीही गुरुवारी सकाळी झी २४ तासशी बोलताना महायुतीला २५० जागा मिळतील, असे म्हटले होते. 


मात्र, सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना-भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुती २०० च्या आकड्यापर्यंत पोहोचणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. १६४ जागा लढवणाऱ्या भाजपला १०० जागांपर्यंतच समाधान मानावे लागू शकते. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे. सध्या काँग्रेस ३८ तर राष्ट्रवादी ५४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपने केलेला एकतर्फी विजयाचा दावा फोल ठरला आहे. 


याशिवाय, अनेक एक्झिट पोल्सनी शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळतील, असे म्हटले होते. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता होती. मात्र, सध्याच्या घडीला शिवसेना ६३ जागांवर आघाडीवर आहे. परंतु, भाजपच्या जागा कमी झाल्यास शिवसेनेचे महायुतीमधील महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. 




अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. तर जयंत पाटील यांनीही राजकारणात कोणीही अस्पृश्य नसते, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याची खेळी खेळली जाऊ शकते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.