मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचा कार्यभार चालविण्यासोबतच आणखीन एका राज्याची जबाबदारी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ३५० हून अधिक जागांवर विजय मिळवून देण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.


३५० जागांहून अधिक जागा मिळविण्याचं लक्ष भाजपने ठेवलं आहे. यामध्ये १३० अशाही जागा आहेत ज्या गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हातून अवघ्या काही मतांनी निसटल्या आहेत. अशा जागांवर विजय मिळविण्यासाठी अमित शहा यांनी खास योजना आखण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाजपला विजय मिळवून देण्याच्या कामाचाही समावेश आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या राज्यात भाजपला आतापर्यंत एकाही जागेवर यश मिळवता आलेले नाहीये. केरळात भाजपचे कमळ फुलविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


यासोबतच आंध्र प्रदेशात तयार करण्यात आलेल्या समितीची जबाबदारी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे कर्नाटक राज्याची जबाबदारी देण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.


अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपला सर्वच्या सर्व ४८ जागांवर विजय मिळविण्याचं लक्ष ठेवलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकत्रित निवडणूक लढले होते. त्यावेळी २४ जागांवर निवडणूक लढवत २३ जागा जिंकण्यात भाजपला यश आलं होतं. तर, शिवसेनेने २० जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांतील संबंध बिघडले आणि मग, दोघेही स्वतंत्र लढले.