Pankaja Munde : पंकजा मुंडे आता काय करणार? कुणी केला पंकजांचा `करेक्ट` कार्यक्रम?
भाजप नेत्या पंजचा मुंडेंना विधानपरिषदेच्या उमेदवारीतून पुन्हा डावलण्यात आलंय. त्यामुळे पंकजा मुंडेंचा विधीमंडळातला प्रवेश आणखीनच लांबलाय.
मुंबई : भाजप नेत्या पंजचा मुंडेंना विधानपरिषदेच्या उमेदवारीतून पुन्हा डावलण्यात आलंय. त्यामुळे पंकजा मुंडेंचा विधीमंडळातला प्रवेश आणखीनच लांबलाय. त्यांचा पत्ता का कापला गेला? कोणते मुद्दे पंकजांना भोवले? आता पंकजा मुंडे काय करणार याबरचा हा विशेष रिपोर्ट. (bjp has not fielded former minister pankaja munde for the legislative council)
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं हेच ते वक्तव्य. ज्यामुळे भाजपच्या वर्तुळात एकेकाळी मोठं वादळ उठलं होतं. पंकजा मुंडेंनी हे विधान करून थेट राज्यातल्या भाजप नेतृत्वालाच आव्हान दिलं होतं. भाजप सत्तेवर असेपर्यंत पंकजा मुंडेंना या विधानाचा कोणताही फटका बसला नाही.
मात्र २०१९ च्या विधानसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि त्यांची गच्छंती सुरू झाली. आतापर्यंत तीन वेळा विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. मात्र त्यांचा प्रत्येकवेळी पत्ता कापण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी पंकजा मुंडेंनाही उमेदवारीबाबत मोठी आशा होती. राज्यातून त्यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला होता असं सांगत यावेळी राज्यातल्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्त्वाकडे बोट दाखवलंय.
पंकजा मुंडेंचं तिकीट कापलं जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांची उमेदवारी डावलण्यात आली आहे. पंकजा यांच्यासोबत मंत्री असलेल्या मात्र विधानसभेचं तिकीट न मिळालेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना आमदारकी आणि पराभूत झालेल्या राम शिंदेंचं पक्षानं पुनर्वसन केलं. मात्र त्यांच्यापेक्षा प्रभावशाली असलेल्या पंकजा मुडेंना कायमच प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आलं.
पंकजा या मास लीडर आहेत. मराठवाड्यातील शक्तीशाली नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. भगवान भक्तीगडावरचं शक्तीप्रदर्शन असो वा गोपीनाथ गडावरचा मेळावा. पंकजांनी केंद्रीय नेत्यांना आणून सातत्यानं आपली ताकद दाखवलीय. भाजपात ओबीसी आणि मराठवाड्यातला सर्वात मोठा चेहरा पंकजा मुंडे आहेत. मात्र त्यांना शह देण्यासाठी कधी भागवत कराड तर कधी राम शिंदे यांना बळ दिलं जातं. त्याच खेळीचा हा भाग असल्याचं बोललं जातंय.
त्यांना विधान परिषदेची उमेदवारी न देण्यामागे विरोधी पक्षनेतेपदाचं कारण असल्याचं बोललं जातंय. पंकजांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली असती तर ज्येष्ठतेच्या निकषावर दरेकरांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आलं असतं. तसंच पंकजांना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर त्यांची तुलना थेट फडणवीसांशी झाली असती. त्यामुळेही त्यांचा पत्ता कापण्यात आल्याचं बोललं जातंय.
महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे विरोधकाच्या भूमिकेत असल्या तरी ओबीसींचा मुद्दा वगळता इतर मुद्यांवर सत्ताधा-यांविरोधात विरोधाची धार फारशी दिसली नाही. या सगळ्याचा फटका स्वाभाविकच पंकजा मुंडेंना बसलेला दिसतोय. पंक्षांतर्गत विरोधकांना खुलेआम धारेवर धरणा-या पंकजा मुंडे आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.