BJP Aggressive : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधआन मोदींबाबत (PM Modi) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी भाजपच्यावतीने आज आंदोलनं (BJP Protest) करण्यात आली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांची टीका
नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालून त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन
मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये भाजपने आंदोलन करत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच कारवाईसाठी राज्यपालांना भेटून निवेदन दिलं जाणार असल्याचं आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी म्हटलं आहे.


दादरमध्ये भाजपने गोमूत्र पाज आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर पुण्यात अलका चौकात भाजपनं आंदोलन केलं. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादच्या सिडको चौकात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 


नागपुरात नाना पटोलेंच्या घराबाहेर भाजपनं आंदोलन केलं. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली, पटोलेंनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप राज्यभरात आक्रमक झाली आहे.  


हिंगोलीत भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्त्यावरून नाना पटोले यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.  आंदोलकांनी पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 


नाना पटोलेंविरोधात पंढरपुरातही भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोलापूर लोकसभा भाजप संघटक शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढ्यात आंदोलन करण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंच्या पुतळ्याला जोडे मारले. त्यानंतर पटोलेंच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं.


सांगलीतही पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झाली. भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं. पटोलेंनी माफी मागितली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.