नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, सभागृहात गोंधळ, थोड्याचवेळात मोर्चा
आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत भाजप पायी मोर्चा करणार
मुंबई : मनी लॉन्ड्रींग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने (BJP) प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेत आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गोंधळ घातला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारने तात्काळ नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे, किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे अशी मागणी केली.
या सभागृहातच आताच याबाबत घोषणा झाली पाहिजे, इतक्या गोष्टी घडल्यानंतर महाराष्ट्राचं सरकार हे नवाब मलिक यांच्या पाठिशी उभं राहिलं तर हे सरकार दाऊदच्या पाठिशी उभं आहे का असा प्रकारचा विचार महाराष्ट्रात होईल असं फडणवीस यांनी म्हटलं. यानंतर विरोधकांनी गोंधळ घालत सभागृहातून बाहेर पडले.
तर विधानसभेच्या बाहेरही विरोधक आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आज मोठा मोर्चा काढणार आहे. नवाब मलीक यांच्या विरोधात फक्त आरोप करत नाही तर इडी आणि एनआयएकडे पुरावे आहे म्हणून राजिनाम्याची मागणी करतोय अशी माहिती भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिलीय.
आम्ही राणीबाग ते आझाद मैदानपर्यंत मोर्चाची परवानगी मागितली होती. बारावीच्या परिक्षा बघता ही परवानगी नाकारली आणि आम्ही देखील सहकार्य करतोय. मात्र आझाद मैदानावरून मेट्रो सिनेमा मार्गे मंत्रालयावर जाण्याचा प्रयत्न करु असही शेलार म्हणाले.