मुंबई : महाराष्ट्र राजकीय पेच निर्माण झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक झाली. आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेने आमच्याशी फोनवर चर्चा केली आणि पाठिंबा देण्यासाठी आवाहन केले. दरम्यान, आघाडीमध्ये बैठक सुरू असताना शिवसेनेच्या गोटातही हालचाली सुरु झाल्या आहेत. आमदारांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मड आयलँडला जात शिवसेना आमदारांची भेट घेतली. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की तुम्हाला प्रलोभन दिले जाईल. तुम्ही सावध राहा. त्याचवेळी त्यांनी भाजपकडून संपर्क साधन्यात येत असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा यावेळी उद्धव यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे आघाडीशी चर्चा करताना भाजपासोबतही बोलणी सुरूच असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्याची माहिती आहे. मड आयलँडच्या हॉटेल रिट्रीटमध्ये असलेल्या आमदारांची त्यांनी संध्याकाळी भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी आमदारांना दोन्ही पर्याय खुले असल्याचं संकेत दिलेत. जे ठरवलंय ते दिलं, तर भाजपासोबत जायला आपण तयार आहोत, असं ठाकरेंनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. आम्ही युती तोडलेली नाही, भाजपानं दिलेला शब्द न पाळल्यानं बाजूला झाल्याचं ते म्हणालेत. राज्यपालांनी भेदभाव केल्यामुळे आपण सुप्रीम कोर्टात गेल्याचं स्पष्टिकरणही त्यांनी आपल्या आमदारांना दिले आहे.


दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीसाठी लिलावतीमध्ये नेत्यांची वर्दळ दिसून आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार यांच्यासह इतरही राजकीय नेत्यांनी संजय राऊतांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.आजचा दिवसही वेगवान राजकीय घडामोडींचा आणि मोठ्या निर्णयाचा दिसून आला. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सकाळी झालेल्या बैठकीनंतर पक्षाने राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला. त्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्र सरकारला राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. मंत्रिमंडळानं याचा निर्णय घेतला आणि साडेपाचच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सही होऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. 


दुसरीकडे शिवसेनेने राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर काँग्रेसचे केंद्रीय नेते मुंबईत दाखल झालेत. त्यांनी शरद पवारांशी सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू केली. दोघांचा एक समान कार्यक्रम तयार झाला आहे. त्याचवेळी भाजपच्या गोटात मात्र दिवसभर पूर्ण शांतता होती. राष्ट्रपती राजवट लागल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले फडणवीस आता माजी मुख्यमंत्री झालेत, हीच भाजपामधली मोठी घडामोड ठरली आहे.