मुंबई: भाजप सध्या सत्तास्थापनेचे तीन अंकी नाटक पाहत आहे. अन्य पक्षांमध्ये सुरु असलेली चर्चा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेसाठी सुरु असलेल्या वाटाघाटींबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आम्ही सध्या सत्तास्थापनेचे तीन अंकी नाटक पाहत आहोत. या चर्चांवर आणि राजकीय परिस्थितीवर भाजप लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे गोबेल्स; शिवसेनेला पुन्हा NDA त स्थान नाही'


तसेच शेलार यांनी भाजपमध्ये होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांबाबतही माहिती दिली. राज्यभरातील ९० हजार बुथवर या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. भाजपचे सर्व आमदार यामध्ये सहभागी होतील. याशिवाय, आगामी दोन दिवसांमध्ये भाजपचे शहरी आणि ग्रामीण भागातील आमदार राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा करतील. यावेळी ते नुकसान भरपाई आणि पीकविम्याची रक्कम मिळवण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीची माहिती घेतील. तसेच मदतकार्याचाही आढावा घेतील, असे आशिष शेलार यांनी सांगितले. 


महाशिवआघाडीचा मसुदा तयार, आता हायकमांड घेणार निर्णय


दादरच्या वसंतस्मृती येथील कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपप्रणित आघाडीतील घटकपक्षांचे नेते आणि भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.