मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उत्तर दिलं आहे. सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकार ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप केला होता. त्यावर भाजपने आता चोख उत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, 'खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामनामधून भाजपा ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल असा आरोप केला आहे. मुळात राऊतांना तिन्ही पक्षामधील अतंर्गत भांडणावरुन सरकार पडेल अशी भीती आहे. जी ते भाजपच्या नावाने बोलवून दाखवत आहेत.'


'कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत आज महाराष्ट्र अडकला आहे. त्यापेक्षा तुम्हाला भाजपवर आरोप करणे महत्त्वाचे वाटते का? सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो का? राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहिन असल्याचे संपूर्ण देशाला माहित आहे.' असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


'कित्येक वर्षापासून मुंबई महापालिका तुमच्या हातात आहे. परंतु दरवर्षी प्रमाणे यंदाही पहिल्या पावसात तुंबली आहे. पूर्ण शहर 3 महिने रिकामे होते. योग्य नियोजन करुन पावसाळ्याआधी सर्व कामे तुम्ही करु शकला असता. पण तुम्ही केले नाही. परिणामी मुंबई पुन्हा तुंबली आणि कोरोनाच्या संकटात आता आणखी वाढ झाली आहे.' अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.



'फक्त केंद्र सरकारच्या चीन विरुद्धच्या कारवाईला मनाला येईल तशी टीका करणं आणि भाजप हे सरकार पाडू बघत आहे अशी विधानं करणं एवढंच वाचायला मिळतं. मी मांडलेल्या समस्यांवर कधी बोलणार?' असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.