मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशंजांना पुरावे घेऊन या, असे सांगितल्यानंतर भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागत आहे. शिवसेनेच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली आहे, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. भाजप या मस्तवालपणाचा निषेध करते. शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने छत्रपतींचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. 


रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते- शरद पवार


तसेच राज्यातील सरकार विश्वासघाताने सत्तेत आले आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. संजय राऊत यांच्या या उद्दाम सवालाशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहमत आहेत का, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. उद्धव ठाकरे या भूमिकेशी सहमत नसतील तर त्यांनी राऊतांवर कारवाई केली पाहिजे. तरच लोकांची खात्री पटेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 


उदयनराजे यांनी केलेली टीका संजय राऊत यांना झोंबली असेल. परंतु, त्यांना शक्य असेल तर त्यांनी छत्रपतींच्या सवालांना उत्तरे द्यायला हवी होती. पण छत्रपतींना उत्तर देता येत नाही म्हणून त्यांच्या वंशाचा पुरावा मागणे हे उद्दामपणाचेच लक्षण आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजांबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची हे शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखवणारे असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.