संजय राऊत पवार साहेबांचा माणूस; नारायण राणेंचा प्रहार
राणेंची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून पंढरपूरात करण्यात आलेल्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेबाबतचा मुद्दा उचलून धरत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. ज्यानंतर आता पुन्हा एकदा राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक प्रहार केला आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांची सामनासाठी घेण्यात आलेली मुलाखत, मराठा आरक्षण, कोरोनाचं संकट अशा मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये सत्ताधाऱी आणि विशेष म्हणजे शिवसेनेच्या भूमिकेवर राणेंनी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं.
इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत सामनातूनच पवारांवर सर्वाधिक टीका करण्यात आली असल्यामुळं इथंच त्यांची मॅरेथॉन मुलाखत होणं ही बाब आश्चर्यकारक असल्याचा टोला त्यांनी लगावला. शरद पवार यांच्याबाबत आपल्या मनात आदराची भावना असल्याचं म्हणत तरीही काही गोष्टी मांडत राणेंनी विषयाला वळण दिलं.
मुलाखतीचा मथळा, 'सत्तेचा दर्प चालत नाही' हे नेमकं कोणाला उद्देशून होतं, असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घमेंड असल्याचं मत चुकीचं आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.
'सेनेमुळे भाजपचे १०५ आले हे कोणाला खरं वाटणार नाही. ३० डिसेंबर ९५ चा अंक आहे माझ्याकडे. उद्धव ठाकरे काय तेव्हा टीका करतात बघा', असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना निशाण्यातवर घेतलं. राज्यात नेमकी सत्ता कोणाची, मुळात राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती उदभवल्यामुळं जनतेचं लक्ष वळण्यासाठीच शरद पवारांची मुलाखत घेण्यात आल्याची टीका राणे यांनी केली.
कोरोना परिस्थितीविषयी....
कोरोना व्हायरसमुळं महाराष्ट्रात १० हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यावर मात करण्यासाठी सामनातील मुलाखतीच्या माध्यमातून उपाय सुचवले गेले असते, मार्गदर्शन झाले असते तर मी समजलो असतो की ही भीमटोला मुलाखत यशस्वी झाली असती, असं राणे थेट शब्दांत म्हणाले.
देशात कोरोनाबाबत रुग्ण आणि मृत्यू हे सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत, याबद्दल पवार साहेब का बोलले नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लॉकडाऊनची अंमलबजावणी राज्यात झाली नाही, बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याबद्दल मुलाखत घेणाऱ्याना काही वाटलं नाही. ही मुलाखत राजकीय होती असं म्हणत भाजपवर टीका करून काहीही होणार नाही, सेना बेईमानी करून काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत गेली, या शब्दांत टीकेची झोड राणेंनी उठवली.
सध्या महाविकासआघआडीचा अंदाधुंदी कारभार पाहता हे कौरवांचं सरकार आहे. त्यामुळं कौरवांचं राज्य जाईल आणि पांडवांचं राज्य येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत हे पवार साहेबांचा माणूस असल्याचं म्हणत नोकरीला सामनामध्ये मात्र.... असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत खुर्चीत उड्या मारत, हसत मुलाखत घेत होते, असं म्हणत राणे यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान राऊतांवरही टीका केल्याचं पाहायला मिळालं.
मराठा आरक्षणासाठी सरकारनं तयारी करायला हवी होती...
( मराठा आरक्षण बाबत ) सरकारनं वकिलांबाबत तयारी करायला पाहिजे होती, हे चित्र राज्यात मात्र सध्या दिसत नाही त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष द्यावं असा आग्रही सूर त्यांनी आळवला.