`ते बाबाचं घरातलं अखेरचं जेवण ठरलं`, पंकजा मुंडेची भावूक पोस्ट व्हायरल
म्हणून 3 जून उजाडलाच नाही पाहिजे असे वाटते
मुंबई: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ३ जून रोजी होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाबद्द पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पंकजा मुंडे यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंकजा यांनी म्हटले आहे की, 3 जून' तसं मी या दिवसाची वाट आजिबात पाहत नाही!! अगदी 2 जून 2014 ला जाऊन जग थांबावं असं वाटतं मनात आनंद, उत्साह, समाधान होतं 2 जून ला... बाबा पोटभर रस पोळी खाऊन गेले होते.. शाहू म्हणाला, "आज साहेबांनी खूप आमरस खाल्ला".. "खाऊ दे रे शाहू" असं त्याला तेच म्हणाले.. तेच अखेरचं जेवण त्यांचं स्वतःच्या घरी.. मग तर पार्थिव देखील घरी आणता आलं नाही.. म्हणून 3 जून उजाडलाच नाही पाहिजे असे वाटते, असे पंकजांनी म्हटले आहे.
मला त्या निर्णयाचा अजिबात धक्का बसला नाही- पंकजा मुंडे
गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन म्हणून साजरा केली जाते. यानिमित्ताने गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर केले आहे.
तसेच यावर्षी गोपीनाथ गडावर दर्शनासाठी किंवा मला भेटण्यासाठी गर्दी करु नका, असेही पंकजांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे. त्याऐवजी घरीच मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.